सह्याद्रीच्या रांगांतून १३५० किमीची पदभ्रमण मोहीम; गोकुळ-धावडे विद्यालयात साहसी वीरांचे स्वागत!

सह्याद्रीच्या रांगांतून १३५० किमीची पदभ्रमण मोहीम; गोकुळ-धावडे विद्यालयात साहसी वीरांचे स्वागत!

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विदयालयामध्ये सुदेश परब व ज्ञानेश्वर नाईक, मालवण (सिंधुदुर्ग )यांचा सत्कार

गोकुळ-धावडे (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून तब्बल १३५० किलोमीटरचा खडतर प्रवास करणाऱ्या सुदेश परब आणि ज्ञानेश्वर नाईक या दोन साहसी युवकांचे मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा मंदिर (दक्षिण काशी) येथून या पदभ्रमण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राचा कणा असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून प्रवास करत कर्नाटक राज्यातील तिल्लारी येथे ही मोहीम समाप्त होणार आहे. या प्रवासादरम्यान या युवकांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर दोन्ही गिर्यारोहकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या या जिद्दीचे कौतुक केले. कठीण भौगोलिक परिस्थिती, हवामानातील बदल आणि शारीरिक आव्हानांना सामोरे जात पूर्ण केल्या जाणाऱ्या या मोहिमेतून विद्यार्थ्यांमध्ये साहसी वृत्ती निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी सुदेश परब व ज्ञानेश्वर नाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निसर्ग संवर्धन, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि आरोग्यासाठी पदभ्रमणाचे फायदे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून चालताना मिळणारा आनंद आणि येणारे अनुभव थक्क करणारे असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साहसी भेटीमुळे परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *