गोकुळ धावडे: मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे या विद्यालयाच्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत श्रमदानातून गावातील ओढ्यावर ‘वनराई बंधारा’ उभारला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्षात आणत विद्यालयाने जलसंवर्धनाचा एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.सध्या सर्वत्र पाण्याची कमतरता भासत असताना, पाण्याचे महत्त्व ओळखून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. एन. एस. कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला. रिकाम्या गोण्यांमध्ये माती आणि वाळू भरून त्या ओढ्याच्या प्रवाहात रचण्यात आल्या, ज्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवण्यात यश आले आहे.या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही यामुळे सुटणार आहे. या बंधाऱ्याच्या निर्मितीमध्ये मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर, शिक्षक श्री.शिंदे टी. व्ही. सर, श्री. विकास लोहार सर, क्लर्क श्री. युवराज कांबळे,शिपाई श्री. बाजीराव यादव सर आणि इको क्लबच्या सर्व विद्यार्थी सदस्यांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व त्यांना समजावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे मुख्याध्यापक मा. श्री.कुंभार एन. एस.सर यांनी सांगितले. ग्रामस्थांनीही विद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Posted inNews and Events










