0

जागतिक महिला दिन ८ मार्च २०२६

Share

स्त्री ही कर्तृत्व, संयम, त्याग यांची परिसीमा असते. डॉ.सुनिता खरात -दौलतनगर ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न.
दौलतनगर दि. 8-भारतीय संस्कृतीत स्त्री ही पूजनीय आहे. स्त्रीच्या बाबतीत आपली परंपरा अत्यंत गौरवशाली आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा अनेक कर्तृत्ववान महिलांनी आपली संस्कृती व देश संपन्न केला आहे. त्यांचा आदर्श घ्या. स्त्री ही कर्तुत्व, संयम, त्याग यांची परिसीमा आहे असे मत ग्रामीण रुग्णालय पाटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता खरात यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनियर कॉलेज दौलतनगर च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य श्री. अजित शिंदे, सौ. प्रज्ञा तासगावकर, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षिकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जागतिक महिला दिनाच्या भित्तीपत्रकांचे उदघाटन, पाककला स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निलोपर संदे यांनी केले. त्यांनी कल्पना चावला, पी. टी. उषा, डॉ. आनंदीबाई जोशी, सिंधुताई सपकाळ यांचे कार्य अलौकिक आहे असे सांगतानाच आपणही त्यांचा आदर्श घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमानिमित्त वेदिका मोहिते,प्रगती भिसे, पूर्वा चव्हाण ,स्वराली गिरी ,अमृता कदम, श्रेया माळी यांनी भाषणे केली.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अजित शिंदे यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी सांगून महिलांनी “चुल व मूल” या पलीकडे जाऊन समाजासाठी, देशासाठी काम केले पाहिजे. स्वतःच्या क्षमतेला न्याय दिला पाहिजे व महिला सक्षम व्हाव्यात त्यासाठी समाजाने त्यांना पाठिंबा द्यावा, तिला साथ द्यावी तरच भारताची गौरवशाली परंपरा पुनर्जिवीत होईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. तनुजा शेजवळ यांनी मानले तर सूत्रसंचालन कू.श्रावणी साळुंखे हिने केले. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी डॉ. सुनिता खरात व सौ.प्रज्ञा तासगावकर यांनी केली व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.