गोकुळ-धावडे: मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे शनिवारी (दि. १३) ‘बाल आनंद बाजाराचे’ आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष व्यवहाराचे धडे गिरवले. या बाल बाजारात एका दिवसात ४६७२ रुपयांची विक्रमी आर्थिक उलाढाल झाली.या बाल बाजाराचे उद्घाटन धावडे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मा. श्री. दत्तात्रय अवघडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन.एस.सर उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार चातुर्य निर्माण व्हावे, त्यांना खरेदी-विक्रीचे कौशल्य समजावे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने विद्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉल्सवर विविध पालेभाज्या, फळभाज्या, स्टेशनरी साहित्य आणि खाद्यपदार्थांची विक्री केली. ग्रामस्थ आणि पालकांनी या बाल बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भरघोस खरेदी केली.विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद कसा साधावा, नफा-तोटा कसा काढावा आणि आर्थिक व्यवहार कसे करावेत, याचा प्रत्यक्ष अनुभव या माध्यमातून घेतला. या संपूर्ण कार्यक्रमात ४६७२ रुपयांची उलाढाल झाली, जी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे आणि नियोजनाचे यश दर्शवते.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.

Posted inNews and Events




