२६ नोव्हेंबर, संविधान दिनाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात अत्यंत उत्साहाचे आणि प्रेरणादायी वातावरणात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर हे होते.
त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. “आपले संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये, जसे की न्याय, स्वातंत्र्य आणि समता, आत्मसात करावीत आणि एक जबाबदार नागरिक बनावे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी श्री. वैभव घोणे सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये याबद्दल सखोल माहिती दिली. त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यामागील विचार समजावून सांगितले.
“आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. या अधिकारांचे रक्षण करणे आणि कर्तव्यांची जाणीव ठेवणे, हीच डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल,” असे श्री. घोणे सर म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी, सौ. पवार मॅडम सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले.
शेवटी, विद्यालयाचे शिक्षक श्री.विकास लोहार सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. त्यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता वाढली, तसेच संविधानातील मूल्यांचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळाली.

Posted inNews and Events






